25/02/2024
आजपासून (२५ फेब्रुवारी) श्री जोतिबा खेट्यास प्रारंभ...
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील डोंगरावर वास्तव्य केलेला दख्खनचा राजा श्री जोतिबा हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान. माघ पौर्णिमा झाल्यानंतरच्या पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भाविक पायी चालत येतात, त्यास 'जोतिबाचे खेटे घालणं' असे म्हणतात. प्रत्येक रविवारी देवाचे दर्शन घेणे आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणे अशी परंपरा आहे.
जोतिबा अर्थात केदारनाथ हे उत्तरेहून दक्षिणेला आले होते. दक्षिणेतील दैत्यांचा संहार करुन अवतारकार्य पूर्ण झाल्यानंतर ते हिमालयात जायला निघाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवी त्या वेळी अनवाणीच धावत वाडी रत्नागिरीपर्यंत गेली आणि तिने श्री जोतिबा देवांना करवीर क्षेत्रात थांबण्याची विनंती केली. तिच्या विनंतीमुळे देव जोतिबा या डोंगरावर विराजमान झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. देवीच्या कृतीचे अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे रक्षण देवाने करावे, अशी विनवणी करीत भाविक हे खेटे घालत असतात.
वेगवेगळ्या देवतांच्या नावांच्या जयघोषात डोंगराच्या पायथ्याशी खेट्यांना सुरुवात होते. मंदिरात या वेळी सकाळी विविध विधी आणि स्तोत्रपठण होते. दहाच्या सुमारास जोतिबा देवाची अलंकारिक महापूजा बांधण्यात येते. त्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास मंदिरात धुपारती होते. भाविकांकडून मंदिराच्या शिखरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण सुरू असते. रात्री पालखी सोहळा पार पडतो.
श्री जोतिबा देवाची कृपा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना. देवाच्या खेट्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे मन:पूर्वक स्वागत...
#श्रीक्षेत्रजोतिबा #दख्खनचाराजाजोतिबा #खेटेप्रारंभ #प्रणाम #भाविकांचे_स्वागत