03/05/2022
महात्मा श्री. बसवेश्वर
महात्मा बसवेश्वरांचा जन्म विजापूर जिल्हात बागेवाडी येथे (वैशाख शुध्द ३) इ.स.११३२ मध्ये शैव ब्राम्हण कुळात झाला. श्री.बसवेश्वरांना नंदिकेश्वरांचा अवतार मानतात जन्मल्यावर त्यांनी रूदन केले नाही. स्तनपान केले नाही. डोळे उघडले नाहीत. पण जातवेद गुरूनी भालावर भस्म लावून इष्टलिंग बांधल्यावर मात्र मुलाने कंठातून आवाज काढला. डोळे उघडले आणि स्तनपान केले. त्यांच्या मातेचे नाव मादंबिका आणि पित्याचे नाव मादरस असे होते. त्यांनी मुंज करण्याचे नाकारले. जातवेद मुनींच्या पाठशाळेत १२ वर्षे सर्व धर्माचा अभ्यास केला. त्यांचे मामा बलदेव हे बिज्जंल राजाच्या दरबारी महामंत्री बसवेश्वरांना हिशोब तपासण्याचे काम मिळाले. तिथे त्यांचा विवाह बलदेव मंञ्याची कन्या गंगांबिका इच्याशी झाला. निलांबिका ही त्यांची व्दितीय पत्नी.
बिज्जल राजाने दरबार भरला असताना एक ताम्रपट उपस्थीत मान्यवरांना वाचावयास दिला तो कोणालाच वाचता आला नाही. बसवेश्वरांनी तो वाचून दाखविला. बिज्जल राजा प्रसन्न झाला. त्याने बसवेश्वरांना राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या मंगळी वेढयास महामंत्रीपद देऊन त्यांचा गौरव केला.
बसवेश्वरांनी श्रमतत्वज्ञान स्पष्ट केले. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. कायकवे कैलास म्हणजे श्रमपुजा हीच इश्वरपूजा हे त्यांचे वचन प्रसिध्द आहे. देवलोक याच भूवर आहे. शिवभक्त जेथे आहेत तेथेच शिवलोक आहे. बाराव्या शतकातील बसवेश्वर हे जगद विख्यात अर्थ शास्त्रज्ञ होते. त्यांच्या दॄष्टीकोनातून परमेश्वर हा सर्वव्यापी सर्व शक्तीमान व जगन्नियंता आहे. मानवाला अधम आणि नीच जीवनातून मुक्त करण्यासाठी बसवेश्वरांनी नवीन दिशा दाखविली. पूर्व जन्माचे या जन्मात मिळते ही चुकीची कल्पना निदर्शनास आणली. बसव या शब्दाचा अर्थ कानडी भाषेत दोन प्रकारे केला जातो. एक धूर वाहणारा - वर उचलणारा‚ दुसरा अर्थ चैतन्य अथवा जीव. वीरशैव या शब्दाचा अर्थ विकार रहित शिवोपासक. कोणत्याही विकल्पाचा विचार न करता शिवाची उपासना करणारे ते वीरशैव. भक्ती करताना विशुध्द अचरणाची जोड संत बसवेश्वरांनी दिली. बसवेश्वरांसारखा महात्मा युगायुगातून एकदा जन्माला येतो. ते १ २ व्या शतकातील विचारवंत क्रांतीकारक समाजसुधारक होते. बसवांची वाणी मधुर शितल होती. त्यांची वचने सुभाषिताप्रमाणे वाटतात त्यांनी तत्वज्ञानाची अभिव्यक्ती करताना सहज सुंदर सोपी भाषा वापरली.
बसवेश्वरांनी वचन वाड्:मयात भक्ती समर्पणभाव‚ सदाचारी वर्तन‚ आत्यंतीक प्रेम‚ शांती यांनी युक्त यथार्थ जीवन‚ अध्यात्मिक अनुशासन यांचे विवरण सामथ्र्यपूर्ण भाषेत केले. ते क्रियाशील नेते‚ मानवतावादी विश्वकवी होते. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी अशी त्यांची वागणूक होती.
सदाचारी मार्गने धन प्राप्ती करून घ्यावी‚ शारिरीक श्रमातून अध्यात्मिक साधना करावी‚ ही त्यांची कल्पना भारतीय तत्वज्ञानात अभिनव होती.
मी पासून अध्यात्म सुरू होते. मी समजावून घेण्याकरिता माणसाला निर्विकार व्हावे लागते. निर्विकार होण्यासाठी अनासक्त होणे अवश्यक आहे.
माणसाच्या वासनेला मर्यादा नसतात त्यामुळे तॄप्ती मिळत नाही. वासनेमुळे पुन्हा जन्म प्राप्त होतो आणि दु:ख भोगावे लागते म्हणून बसवेश्वरांनी लोकांना वासनेचा त्याग करण्याची शिकवण दिली.
मंत्री झाल्यावर त्यांनी भिक्षा मागू नये‚ बेकार राहून आळसात हिंडू नये इत्यादी दंडक घातले. दुस-याच्या श्रमावर कोणी आयते जगू नये. धन संचय करू नये‚ अपंगाना अथवा ज्यांना ज्या वस्तुची अवशकता असेल त्यांना त्या वस्तुच्या रूपाने अतिरिक्त धनाचे वितरण करावे. तन‚ मन‚ धनाने समाजाची सेवा म्हणजे दासोह. धर्माचे मुख्य कार्य म्हणजे समाजाचे सुख होय. उद्योग धंद्याच्या उच्च निचतेवर जाती भेद मानण्याची रूढी त्यांना संमत नव्हती. त्यांनी कष्ट करणा-या सामान्य लोकात असलेला न्युनगंड काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
ते निराभीमानी‚ निस्पॄह‚ निरिच्छ होते. प्रत्येकाला आवडी प्रमाणे व्यवसाय निवडता आला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. त्यानी शिवानुभव मंटप नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या ७00 पुरूष आणि ६३ ते ७0 महिला सदस्य होत्या. तिथे सर्व विषयावर चर्चा होत असे. या संस्थेत स्त्री पुरूष‚ स्पॄश्य अस्पॄश्य‚ राव रंक असा कोणताच भेद नव्हता. या पीठातीला प्रत्येक व्यक्ती स्वत: कष्ट करीत असे.
शिवानुभव मंटप परिषदेसाठी कश्मिरचे राजे महादेव भूपाल आले होते आणि बसवेश्वरांच्या उपदेशाने त्यांच्या क्रांती कार्याचे पार्इक झाले आणि मोळगी मोर-या बनून लाकूड तोडण्याचा धंदा करीत सपत्नीक कल्याणला राहीले. बसवेश्वरांची वागणूक नीच वा शुद्र व्यक्तीशीही लीनतेची‚ अपुलकीची‚ सेवाभावनेची असे. एकदा त्याच्या प्रसादात चोर शिरला. त्याने बसवेश्वरांच्या पत्नी निलांबीका यांच्या सोन्याच्या मंगळसुत्रास हात घातला. निलांबिका चोर चोर म्हणून ओरडू लागल्या बसवेश्वर तिथे धावून गेले त्यांनी पत्नीला दोष देऊन म्हटले धनाचा संग्रह ही चोरीच होय. म्हणून तू खरी चोर आहेस. तुला निर्लोभीपणाचा धडा शिकविण्यासाठी साक्षात शिवशंकर चोराच्या रूपाने आले आहेत. मंगळसुत्रातील सोन्याचे मणी तू त्यांना काढून दे. सर्वाभूती परमेश्वर पाहण्याचा त्याचा हा उदार दॄष्टीकोन पाहून चोराचे दय परिवर्तन झाले आणी तो त्यांचा शिष्य बनला. जाती भेदाच्या भिंती धूळीला मिळऊन त्यांनी चांभाराच्या घरी प्रसाद ग्रहण केला.
माझ्याहून कोणी लहान नाही या दिव्य वाणीने बसवेश्वर यशस्वी अर्थपूर्ण जीवनाची गूरू कील्ली सर्व श्रेष्ठ साहित्यिक होऊन गेले. त्याचे तत्वज्ञान दोन हजार वचना मध्ये सामावले आहे.
दुस-यांच्या चुका सुधारण्याची कोणी धडपड करू नये. अगोदर स्वत:च्या चुका सुधारा. आपले मन आणी अंत:करण शुध्द ठेवा. सदाचाराने वागा. माणूसकीने जगून इतरांना माणूसकीने जगवा. दुष्कॄत्याला भ्यावे‚ हरिजन वाडयाची जमीन आणि शिवालयाची जमीन वेगळी नसते. शौचाचे पाणी आणि पुजेचे पाणी वेगळे नसते. परस्त्री अभिलाषेला भ्यावे‚ त्यांनी अस्पॄश्य कोणाला म्हणावे ते सांगितले. दुसयाची हत्या करणारा‚ अभक्ष भक्षण करणारा‚ दुसयाचा उपहार करणारा तो अस्पॄश्य. देव लोक मानवलोक वेगळे नाहीत शिवभक्तपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. चोरी करून् नये‚ खोटे बोलू नये‚ निंदा करू नये इत्यादी बसवेश्वरांचे संदेश आजही मार्गदर्शक आहेत. त्यांनी आत्मशुध्दी करिता नियम सांगितले.
“करू नको हिंसा‚ करू नको स्तुती‚ करू नको क्रोध‚ दोषारोप.”
महात्मा बसवेश्वर आद्य समाज सुधारक होते. जाती विहीन समाज म्हणजे भयंकर कल्पना होती. त्यांनी बाल विवाहास बंदी केली. विधवा विवाहास उत्तेजन दिले. सर्रास रोटी व्यवहार घडवून आणले वैधव्य आले तर सती जाण्याची गरज नाही असे सांगितले. ते स्त्री स्वातंञ्य लढयाचे आद्य प्रणेते होते.
वैदिक काळात स्त्रीयांना पुरूषांच्या बरोबर स्थान होते. स्त्रीयांचा दास्य काळी त्यानंतर सुरू झाला. स्त्रीयांना माना दिला जातो तिथे देव प्रसन्न होतो असे जरी मनूने म्हटले तरी मनू स्त्रीयांना कमी लेखतो स्त्रीया स्वभावताच भ्रष्ट असतात स्त्रिया स्वातंञ्य प्राप्तीस योग्य नाहीत असे मनू म्हणतो.
स्त्रियाकडे पाहू नका. त्याच्या बरोबर बोलण्याचा प्रसंग आला तर दूर रहा. त्याच आपण होऊन बोलल्या तर सावध रहा असा बुध्दाने उपदेश केला. बसवेश्वरांनी या रूढी विरूध्द बंड पुकारले त्यामुळे स्त्रिमुक्ती जवळ आली. स्त्रिला तीच्या पतीकडून - पित्याकडून प्रोत्साहन मिळते तेंव्हा ती आपले सामर्थ्य प्रकट करते. आजही स्त्रियांवर अनन्वीत अत्याचार होतात. त्याकाळी बसवेश्वरांनी स्त्रियांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कीती प्रखर लढा दिला असेल याची कल्पना करावी. चूल आणि मूल एवढीच स्त्रियाची जबाबदारी नसून त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात समानतेने भाग घ्यावा असे उद्घोषित केले.
सर्व प्रांतात स्त्रिाया यशस्वी होऊ शकतात हे सिध्द झाले आहे. काही क्षेत्रात स्त्रिया पुरूषापेक्षा कांकणभर सरस ठरतात. स्त्रियांचे कतॄत्व बसवेश्वरांनी जाणले होते. त्याच्या दोन्ही पत्नी गंगाबिका आणि निलांबिका गंगायमुना सारख्या धर्मकार्यात एकप्रवाही बनल्या होत्या. गंगाबिका देवी तर ही त्या काळाची सावीत्री बार्इ फुले होती स्त्रियांना ८५0 वर्षा पूर्वी शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची प्रेरणा देणारी ही भारतीय इतिहासातील पहिली समाजसेविका होय. अनुभव मंटपात ७0 स्त्रिया होत्या. त्या पुरूषाप्रमाणे उपजिवीकेसाठी श्रम करीत. स्त्रियांनी सदाचाराने जगावे. समाजाने त्यांना चरितार्थाचा मार्ग उपलब्ध करून द्यावा. समाजातील व्यक्तींनी निराधार स्त्रियाशी विवाह करण्यास पुढे यावे असे बसवेश्वर म्हणत.
जाती धर्म पंथ दूर करून मानवतावादी समाज निर्माण करावा ही बसवेश्वरांची आचार धर्माची शिकवण होती. जाती विहीन समाज या कल्पनेने सनातनी संतापले. त्यांनी बिज्जल राजाचे मन कलूषीत केले. बसवेश्वरांनी ब्राम्हण आणि अस्पॄषात विवाह घडवून आणला. म्हणून कर्मठ लोकांनी आकांड तांडव केले. वातावरण तापू नये म्हणून वधूवर पक्षातील प्रमूखांना बिज्जल राजाने फाशी दीले. बसवेश्वरांनी मंत्रीपदाचा त्याग केला. आणि संगम क्षेत्रात ११६७ साली समाधी घेतली. कॄष्णा मलप्रभेच्या संगमावर ही महा मंगल ज्योत समता व विश्व बंधुत्वाचा प्रकाश देत अखंड तेवत आहे.
इष्टलिंगाच्या पूजेने इश्वरार्चनाची नवीन पध्दत सुरू झाली. मूर्ती पूजा आणि तिर्थ यात्रा त्याज्य ठरवून वैदिक कर्मकांडाची बैठक खिळखिळी केली. साधी राहणी घेऊन गरजेपूरते नितीच्या मार्गने कमावून निढळाच्या घामाने उदर निर्वाह केला पाहिजे. धंदा सचोटीने शिवापर्ण बुध्दिने करून निर्वाहा पुरते द्रव्य वापरणे हा खरा धर्म. दारिद्रय हे काही पूर्व संचीताचे फळ नव्हे असे सांगणारे बसवेश्वर हे पहिलेच समाज क्रांतीकारक मध्ययुगीन नेते होते.
https://www.veershaivlingayat.in/History.aspx