19/04/2024
CP Kedar Soman FB post
एकदम दिल के करीबवाली पोस्ट
कोकण कोकण कोकण कोकण ..... हे असे आयुष्याला तृप्तता देणारे दिवस आपल्या लेकरांच्या नशिबी नाहीयेत. आपणच पुढाकार घेऊन आपल्या senior मंडळीची परंपरा पुढे सुरू ठेवली पाहीजे 😇
#फणस
सरत्या उन्हाळ्याचे दिवस असायचे.
माझे वडील आणि दोन आत्या आणि दोन काका आणि दोन काकवा, आणि एक आतोबा, अशी सात ते आठ लोक, 15 मे नंतर, आमच्या गुहागर तालुक्यातील गावाला जायची.
माझ्या वडिलांना आणि त्यांच्या चारी भावंडाना, गावाबद्दल प्रचंड प्रेम.
त्यांनी ठरवलेच होते की, जो पर्यंत आपण कोणावर अवलंबून नाही,तो पर्यन्त, 15 मे नंतर, 15/20 दिवस गावाला जाऊन राहायचे.
त्यावेळी आमच्या गावाला, रिलायन्स चे नेटवर्क जेमतेम यायचे. मग त्या फोन वरून,मला वडील कॉल करायचे.
"केदार, आंबा छान आलाय, किती ठेवू तुझ्यासाठी?"
(लॉकडाऊन पूर्वीपर्यन्त,मी माझ्या क्लाएन्ट्स ना, तीन डझन आंबे नेऊन द्यायचो,घरपोच, माझ्या गावचा आंबा म्हणून. एखादा क्लायंट जास्त आवडता असेल तर त्याला 6 डझन😍😂)
मग मी, बायको, मुलगी, इथले भाऊ बहीण..... एखादा दिवस ठरवून, गावाला जायला निघायचो.
एका गाडीत, बायका आणि मुली,मुलं(ड्रायव्हर ला घेऊन यायचो) आणि एका गाडीत आम्ही फक्त पुरुष. अशी विभागणी असल्याने, प्रवास मस्त हसतखेळत व्हायचा😃
गेल्यावर आम्हा मंडळींचे, सिनियर मंडळींकडून जंगी स्वागत व्हायचे.
रात्री अर्थातच, अनलिमिटेड आमरस, साजूक तूप आणि पोळी....हा बेत असायचा.
त्यानंतर, पत्ते खेळत अंगणात बसणे, आणि मुंबईत आयुष्यात कधी दिसत नाहीत,इतक्या चांदण्या बघणे,हा ठरलेला कार्यक्रम असायचा.
सकाळी उठल्यावर, ब्रेकफास्ट केला की, धबधब्यावर पोहायला जाणे(कोकणातील गाव असून ही, आम्हाला 12माही पाणी आहे) आणि डुंबणे,हा कार्यक्रम असायचाच.
सिनियर मंडळी घरी थांबून, दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची आणि आम्ही डुंबायला जायचो.
दुपारी परत आल्यावर, गावच्या काकाने, गरम मसाल्यात केलेली भन्नाट आमटी, गावचा घरचा भात, पापड आणि आंबे....असा भन्नाट बेत असायचा.
मग एखादंदोन दिवसांनी संध्याकाळी, फणस कापणे हा कार्यक्रम असायचा.
फणसात मुख्यत्वे दोन प्रकार, कापा आणि बरका.
आम्ही कोकणातली मंडळी, बरका फणस हा, फणसाची साठं करणे, सांदणे करणे, घारगे करणे...ह्याच साठी उपयोगात आणतो.
कारण बरक्याचे गरे हे खायला गिळगीळीत असतात.
सांदण्या वरून आठवले, दारच्या बरक्या फणसाची, चुलीवर केलेली सांदणे आणि दारच्या नारळाचे दूध....हे ज्यांनी खाल्ले आहे,ते परमभाग्याचे पुरुष आहेत❤️❤️❤️❤️
कापा फणस कापणे,हे एक स्किल आहे.
मागच्या पडवीत सर्वांनी बसायचे, वर्तमानपत्राचे कागद सर्वत्र पसरलेले असायचे, त्यावर तीन चार कापा फणस असायचे. त्याच्या देठाला एका विशिष्ठ अँगल ने कट द्यायचा असतो,की जेणे करून, भरपूर चीक तिकडूनच बाहेर पडेल.
मग सर्वांनी हाताला, खोबरेल तेल लावून, कापा फणसाचे गरे, त्यातून निवडायचे.
गायी साठी चारखंड नीट ठेवले जात.
कापा फणसाचे गरे म्हणजे,अत्यंत मधुर आणि सुवासिक❤️
असो......
आता कोणीही सिनियर मंडळी उरली नाहीत. सगळे एकेक करत निजधामास गेले.
त्यावेळी, ह्या सिनियर मंडळींच्या आग्रहाचा कधी कधी जाच वाटायचा, काय प्रत्येक उन्हाळ्यात कोकणात जायचं त्या उकाड्यात, जरा वेगळ्या स्पॉट ना जाऊ की... असे आम्हा सर्व मंडळींच्या मनात यायचे.
पण आज ह्या मागच्या पिढीने,जेआठवणींचे जे रुचीचे, जे स्वादाचे भांडार आम्हाला दिलेले आहे, त्याचे मोल कशात ही करू शकत नाही.
अजूनही क्वचित कधी माझ्या वडिलांचा आवाज ऐकू येतो.....
"विज्या, फणस कापायचाय,पेपर घेऊन ये, अव्या, खोबरेल तेल घेऊन ये, मंदे, तू चहाचे बघ, आम्ही फणस कापतोय"
अक्षरशः नेहमी नेहमी घडणारे प्रसंग आणि गोष्टी, ज्यावेळी कायमसाठी काळाच्या पडद्याआड,परत कधीच न येण्यासाठी जातात,त्याचवेळी त्याच अमूल्य असे महत्व समजतं, पण त्याचा उपयोग काही नसतो.
गेली, 5/7 वर्ष झाली, ना मला आंब्यात इंटरेस्ट उरलाय आणि ना फणसात.
मुलीला आवडतो म्हणून, भरपूर आंबे घरी आणतो, पण स्वतःहून उचलून आंबा खाण्याची इच्छा, ह्या सर्व मंडळीं सोबतच निघून गेली आहे😞