18/07/2021
*विवाह एक : समस्या अनेक!*
विवाह हा आयुष्यातला एक कसोटीचा व अत्यानंदाचा अनुभव असतो. विवाह जुळविण्यात कसोटी असते, तर तो संपन्न करण्यात आनंद असतो.
विवाह हा आयुष्यातला एक कसोटीचा व अत्यानंदाचा अनुभव असतो. विवाह जुळविण्यात कसोटी असते, तर तो संपन्न करण्यात आनंद असतो. सावधानपणे व चाणाक्षपणेच कसोटीला उतरता येते व तसे उतरता आले नाही, तर आयुष्यभर पश्चात्ताप करीत बसावे लागते आणि विवाह समाधानकारकरीत्या संपन्न झाला नाही, तर आयुष्यभर आनंदाला मुकावे लागते. सामंजस्य दाखविले, तरच हरवलेला आनंद पुन्हा मिळविता येतो.
विवाह जुळविण्यात कसोटी लागते, ती दोन्ही बाजूंची. योग्य वर आणि वधू निवडता आले, तरच यश पदरी पडते, अन्यथा पश्चात्तापज्वर हैराण करून टाकतो आणि ते घटस्फोटापर्यंत प्रकरण नेऊन ठेवते.
पूर्वी अल्पवयातच लग्ने जुळायची व होऊनही जायची. त्यात वडीलधाऱ्यांचीच मुख्य भूमिका असायची. ते सांगतील ते व करतील ते निमूटपणे मानले जायचे. लग्नापूर्वी मुलामुलींना एकमेकांना भेटायला व बोलायलाच काय पण पाहायलाही मिळायचे नाही. लग्न-विधीतच एकमेकांना बोलायला व भेटायला नाही, पण पाहायला मात्र मिळायचे व समाधान किंवा असमाधान व्हायचे. पण ते पत्करावेच लागायचे. त्याला दुसरा पर्यायच उपलब्ध नसायचा. ही जन्मगाठ स्वर्गातच बांधली गेली आहे. असे मानून निमूटपणे मान्य करावे लागायचे.
आता मात्र परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. वय झाल्यावरच काय, पण त्याहूनही उशिरा लग्ने जुळतात व लागतात. त्यात वडीलधाऱ्यांची मर्जी संपादित केली जातेच असे नाही. तरुण-तरुणींना पूर्ण समज आलेली असते व आपल्याच मनासारखे करण्याचा त्यांचा निर्धार पक्का झालेला असतो. जोडीदाराची जात, धर्म, पंथ, प्रांत, देश इत्यादीबाबत पूर्वी पाळली जाणारी बंधने आता आवश्यक राहिलेली नाहीत. मनाला वाटले व पटले ते करून टाकले असा जमाना आला आहे.
आपल्या स्वत:च्या अशा अपेक्षा असतात. त्या वास्तवाला धरून असतातच असे नाही. मी कसाही असलो वा कशीही असले, तरी माझा जोडीदार/ जोडीदारीण सर्वोत्तम, सवरेत्कृष्ट, अतुलनीयच असायला हवा/हवी, अशीच अपेक्षा असते. त्या अपेक्षापूर्तीसाठी किती स्थळे पाहायची व किती जोडे-चपला झिजवायच्या याचे काहींना भानच राहत नाही व त्यातच वय नको तितके वाढत जाऊन रखडत बसायचीही पाळी येते. आपली तेवढी पात्रता नसताना ही अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या वरांना सांगावे लागते,
मात्र एवढे सर्व गुण एकवटलेला तरुण सापडणे कठीणच. म्हणून मग तिलाही सांगावे लागते, रखडत पडायचे नसेल, तर हट्ट सोडून भानावर ये व खूप गुण नसले, तरी निदान दुर्गुण नसलेल्या एखाद्याशी जुळवून घे.
जोडीदार निवडताना रंग, रूप, वय, शिक्षण, कर्तबगारी, कुल-शील घराणे, स्वभाव, गुणसंपन्नता, निव्र्यसनता इ. अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यात तारताम्यताही बाळगावी लागते. आपले स्वत:चे रंग, रूप, वय, शिक्षण, कर्तबगारी, कुल-शील घराणे, स्वभाव, गुणसंपन्नता, निव्र्यसनता इ. ही लक्षात घ्यावे लागतात व आपली अनुरूपताही शोधावी लागते. सम-समान संयोगच यशस्वी व सुखदायी ठरतो. म्हणून अवास्तवतेला सोडचिठ्ठी देऊन वास्तवतेच्या आधारावरच या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे लागत.
हाच विवाहमंत्र आपल्या कामी येऊ शकतो व आपल्या समस्या सोडवू शकतो. हे सुज्ञास सांगणे न लगे!
संचालक: श्री विठ्ठलराव पाटील व प्रा. सौ मिना पाटील
छावा मराठा विवाह केंद्र, औरंगाबाद
🙏🙏🙏