27/10/2017
हे पांडू ...
तुझा नंबर पण नव्हता माझ्याकडे, एक दिवस सहज फेसबुक चाळताना सजेशेन मधे तुझं प्रोफाईल दिसलं आणि उगीच माझ्या काळजाची धड धड वाढली, मी उगीचंच इकडे तिकडे बघितले, क्लिक करू कि नको करू कि नको विचार करत धाडसानेच क्लिक केला, जणू काय तुला समजणारच होते. आणि तुझं प्रोफाईल सावकाश चाळू लागले, चुकून एखादा लाईक जाऊ नये हि भीती होतीच. तेवढ्यात नवरा आला आणि कधीच न घाबरणारी मी तुझं प्रोफाईल हटवायचा प्रयत्न करू लागले. दोन वर्ष एकत्र कॉलेज केले, आपल्यात काहीच नसताना असं का झालं असावं? खरंच आपल्यात काही होतं? किंवा आपल्यात खरंच काही नव्हतं? बाकी तुझे बनियान वरचे फोटो पाहून मला उगीच कसंतरी झालं, आता मस्कुलीन दिसतोय, तेव्हा किती हडकुळा होतास, पण बॉलिंग टाकताना बघीतलं कि वाटायचं ह्या काडी दंडात एवढी ताकद कुठून येते, पन्नास मीटर वरून पळत येवून कॉलेजच्या टूर्नामेंट मध्ये जेव्हा तू एकजनाला बोल्ड करताना स्टंप मोडला होता त्यावेळी मला उगीच जास्त आनंद झाला होता. आणि हो तो ढगळा टी शर्ट आणि चप्पल घालून ब्याटिंग करणारा तू एकटाच कॉलेज मध्ये. किती सहज फटके मारायचास. ते ओरिसाच्या कुणाच्या तर बॉलिंग वर तू पोइंटला सहजच बॉल मैदानाबाहेर फेकला होता आणि बॉल कडे नंतर बघितले सुद्धा नव्हते, आपलं नुसतं चड्डीतलं गार्ड व्यवस्थित करण्याचे नाटक केले होते. मी काय चीरकले होते, खरं सांगू मला तेव्हा तुझ्या दंडाला हात लावायची इछ्या झाली होती. आणि तुझी ती मैत्रीण उगीच शांत बसून पाहत होती, तिच्या तोंडावर लय माज दिसत होता मला. जणू काय मला सगळं माहित आहे, आणि पांडू माझाच आहे.
तू सामना संपवून येताना कुणाकडेच नाही, तुझ्या त्या मैत्रिणीकडे पण नाही, पण माझ्याकडे टाकलेली नजर अजून माझ्या अंगावर काटा आनते. आपल्या दोघांना माहित होतं, कि आपल्यात काहीतरी आकर्षण आहे, डोळ्यांनी एकमेकांना बोलायचो, पण जवळ भेटल्यावर तू किती सहज बोलायचासं, “काय गं मंजे, जरा अभ्यास बिभ्यास करत जाकी, नेहमी क्यांटीनलाच काय असतेस” मला माहिताय, आपल्या वागण्यात सहजपणा यावा म्हणून तू तसं करायचास आणि मग तू दूर जाई पर्यंत मी नुसतंच तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसायची.
बाकी चांगला नाद लावून घेतलाय, आता ट्रेकिंग वगैरे, मला माहिताय, तुला काहीनाकाही नाद लावून घ्यायची सवयच आहे. सिगारेट वगैरे नादापेक्षा ते कितीतरी चांगलं. कॉलेज क्यांटीन मध्ये बाकी पोरं घाबरत असताना, मुलीसमोर सहसा धाडस करत नसताना, तु मात्र बिंधास्त सिगारेट फुकायाचा, माझ्या ग्रुपमधल्या काही मुलींचा तू व्हिलन होतास तर काहींचा हिरो. मला आवडायचा तू, जगाला कोलून त्यांच्यावर धूर सोडत असतानाचा. बाकी आता आपल्या एक दिवस आणि एक रात्रीच्या सहवासात सिगारेट पिला नाहीस, मला नाही वाटत तू मला घाबरला असशील, पण तू सोडली असशील. सोडली तर चागलंच आहे.
You know, असं वाटलं, मी तुझ्या प्रोफाईल वर क्लिक केलं आणि मी घसरले, आता सावरायचं सावरायचं ठरवत असताना तब्बल पंधरा दिवसांनी तुला रिक्वेस्ट पाठवली. मला माहित आहे तू पण मला शोधलं असशील, पण तू माजुरडा आहेस, रिक्वेस्ट पाठवणार नाही हि खात्री होती. मग मीच पाठवली. कारण तीन वर्षा नंतर भारतात येणार होते, तुझी भेट घ्यायला आवडणारच होते. कॉलेजच्या आयुष्या पासून एकदा घसरायची इछ्या होती, तुझ्या बरोबर, ती पूर्ण करण्यासाठी मला तुला भेटायचं होतं, मला माहित नव्हतं कि तू किती प्रतिसाद देशील, पण तेव्हाची ती नजर मला धोका देणार नाही याची खात्री होती...............................
लिहिण्यातून क्रमश......