03/03/2022
*रंग बिरंगी रसवंती गृह*.. एक आठवण..
आमच्या लहानपणी, उन्हाळासुरू होता होता, किंबहुना थोडं आधीच, शहरात रसवंती गृहांच आगमन व्हायचं.. उसाचा ताजा रस विकणारी ही रसवंती गृह आम्हा मुलांसाठी एक पर्वणीच असायची..
शहरातल्या वेगवेगळ्या भागात छोटी मोठी रसवंती गृह सुरू व्हायची. त्यांचा पॅटर्न अगदी टिपिकल असे.
आमच्यासाठी आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या ट्युबलाइट्स.. सर्व रसवंती गृहात या ट्युबलाइट्स हमखास लावल्या जात.. त्यामुळेच कदाचित आमच्यासारखे ग्राहक तिकडे आकर्षित होत. लाल, हिरवा, पिवळा अश्या वेगवेगळ्या रंगात त्या ट्युबलाइट्स असत.. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळे नंतर तर तो सगळा सेट अप खूपच आकर्षक दिसे.. अश्या रंगबिरंगी ट्युबलाइट्स आपल्या घरी का नाहीत असा प्रश्न पडे..
ट्युबलाइट नेहेमीचीच असते पण तिला वेगवेगळ्या रंगाच्या जिलेटीन पेपरने गुंडाळले जाते आणि मग ते वेगवेगळे रंग दिसायला लागतात हे समजण्यासाठी आम्हाला बरेच दिवस लागले..
रसाची गुऱ्हाळ मुख्यतः तीन प्रकारची असत. १. बैल लावून रस काढणे २. माणसाने स्वतः रस काढणे आणि ३. मोटर मशीन लावून रस काढणे.. पण तिन्ही मध्ये एक गोष्ट मात्र सारखी असायची. ती म्हणजे खूळ खूळ खूळ खूळ आवाज करणारे घुंगरू.. तो आवाजही खूप आवडायचा..
९०% रसवंती गृहात काचेचे ते ग्लास पण सारखेच असत आणि त्यांचा साईझ सुद्धा सारखाच असे.. बहुधा ते त्यांचं स्टँडर्ड मापच असावं..
एक फुल घेण्यापेक्षा दोन हाफ घेतले तर थोडा रस जास्त मिळतो असं वाटायचे ते दिवस होते..
बऱ्याच ठिकाणी त्यांची बैठक व्यवस्था पण जवळपास सारखीच.. लाकडी बाकडे आणि लाकडीच टेबल्स.. काही ठिकाणी टेबल वर कपडा घातलेला असायचा. तो कपडा प्लास्टिक किंवा रेक्झिन चा असायचा.. टेबलांना रंग पण टिपिकल.. निळा किंवा हिरवा..
नंतर नंतर प्लास्टिकचे आगमन झाले.. लाकडाच्या बाकड्यांची आणि टेबल ची जागा प्लास्टिकच्या टेबल खुर्च्यांनी घेतली..
रसवंती गृहाच्या भिंती पण साधारणपणे सारख्याच असत.. रंगीबेरंगी कनाती लावून तीन बाजूंनी झाकलेले असायचे.. रसात घालायचा बर्फ थर्माकोलच्या डब्यात किंवा गोणपाटात झाकून ठेवलेला असे.. बर्फ फोडण्यासाठी जाडसर रबराच्या ट्युबचा वापर पण सगळीकडे सारखाच.. ग्लासात टाकायच्या आधी तो बर्फ पाण्याने धुवून घ्यायचा..
ग्लासात भरपूर बर्फ टाकला की रस कमी बसायचा. म्हणून मग " दादा, बर्फ जरा कमीच टाका हं" अशी सूचना द्यायची.. लिंबू, आलं आणि काळं मीठ हे रसाचे साथीदार.. त्यातही काळं मीठ सगळ्या ठिकाणी असायचं. पण लिंबू किंवा आलं हे त्या रसवंती गृहाच्या मालकाच्या मर्जीवर असायचं..
आपल्या मानवी मनाची पण गंमत आहे ना.. " जी गोष्ट ओरिजिनल जशी आहे, ती तशीच्या तशी आपण स्वीकारतच नाही." त्यात काही ना काही तरी कमी जास्त करतोच आपण.. काही तरी एक्स्ट्रा हवंच असतं आपल्याला..
मला स्वतःला लिंबूयुक्त आणि आलयुक्त दोन्ही प्रकारचा रस आवडतो..
काही काही रसाची गुऱ्हाळे पक्क्या दुकानांमध्ये असत.. ती तर फारच भारी वाटायची..
काळानुसार रसाच्या गुऱ्हाळात सुद्धा बदल होत गेले.. काही ठिकाणी फ्रीज आले. त्यात शीतपेय आली.. पाण्याच्या बाटल्या आल्या.. आपले पारंपरिक मोठ्ठे मोठ्ठे पाण्याचे माठ ( रांजण ) मागे पडले..
रसाच्या गुऱ्हाळचा अजून एक प्रकार म्हणजे घरापर्यंत येणारे हातगाडीवरचे गुऱ्हाळ.. घुंगरू त्यालाही असायचेच.. बर्फाची रबरी ट्यूब त्यालाही असायचीच..
पण अलीकडच्या काळात सगळेच बदलत गेले.. टिपिकल पारंपरिक रसवंती गृह आता काळाच्या ओघात खूपच कमी झाली आहेत. नुसत्या उसाच्या रसावर दुकान चालवणे आता परवडत नाही.. काचेचे ग्लास गेले. प्लास्टिकचे आणि पेपरचे ग्लास आले.
गल्लोगल्ली फिरणाऱ्या, रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या हातगाड्या मात्र अजूनही कशी बशी तग धरून आहेत..
मी बऱ्याच वेळा बिना बर्फाचा रस सांगत असे.. तरी पण रस थोडा फार गार असायचाच.. मला त्याचं नेहेमीच कुतूहल वाटायचं.. असं वाटायचं की रस पात्तळ करायला हा दुकानदार त्या "स्टीलच्या पातेल्यात" ज्यात रस काढतात, त्यात हा आधीच बर्फ टाकून ठेवत असावा.. मग संशोधनाअंती असं लक्षात आलं की रस गाळण्याच्या गाळणीतच बर्फाचे दोन तीन तुकडे ठेवलेले असतात.. छान वाटायचं ते सुद्धा..
आताशा रस प्यायचं प्रमाण सुद्धा खूपच कमी झालंय.. माझ्या मुलीला माझ्यासारखं रसाचे आकर्षण नाहीये.. तिला आकर्षण आहे *स्टारबक्सच्या कोल्ड कॉफीचे*..
कालाय तस्माई नमः.. दुसरं काय..
तुम्हाला आठवतात का ती रसाची गुऱ्हाळ?? तुमच्या आहेत का काही आठवणी??
राहुल भावे
०२/०३/२०२२