02/11/2021
आयुर्वेद प्रवर्तवोनि अवघा अंगांसवे आठही ।
आधिव्याधि निवारितो सहज जो वारी विषारी अही ॥
जो घे जन्म महार्णवांत कधि वा धन्वाख्य राजाघरी ।
तो वैद्येश्वर विष्णुरूप नमिला धन्वंतरी अंतरी ॥
आज धनत्रयोदशी. आजच्या दिवशी देवासुरांनी एकत्रितपणे चालविलेल्या समुद्रमंथनातून धन्वंतरी अवतरले. धन्वंतरी म्हणजे नारायणांच्या अंशांशावतार होत. द्वापरयुगामध्ये धन्व नावाच्या राजाच्या उदरी धन्वंतरी पुन्हा अवतरले. धन्वन् या शब्दाचा अर्थ मरुस्थळ (वाळवंट) असा होतो. आयुष्याच्या मार्गामध्ये येणार्या आधिव्याधिरूप वाळवंटातून वा पूर्ण संसाररूपी मरुभूमीतूनच जो तारतो तो 'धन्वंतरि' होय अशी या नावाची व्युत्पत्ती केली जाते. काही विद्वानांच्या मते 'धन्वन्' या शब्दा आधारे धनुर्वेद व त्याने ध्वनित होणार्या सर्वच कला, विद्या व शास्त्रे यांचा पार ज्याने पाहिला आणि इतरांनाही दाखविला (थोडक्यात सकलविद्याशास्त्रपारंगत) तो धन्वंतरि होय अशीही व्युत्पत्ती दाखविता येते.
तर अशा या धन्वंतरिरूपामध्ये भगवंताने समुद्राच्या उदरांत लपलेले अमृत स्वतःबरोबरच प्रकट केले. १) कायचिकित्सा २) बालचिकित्सा ३) ग्रहचिकित्सा ४) ऊर्ध्वांगचिकित्सा ५) शल्यचिकित्सा ६) दंष्ट्राचिकित्सा ७) जराचिकित्सा ८) वृषचिकित्सा, या आठ अंगांनी परिपूर्ण आयुर्वेदाचे प्रवर्तन केले. ब्रह्मवैवर्तपुराणामध्ये त्यांनी मनसादेवीसह विषोन्मत्त नागकुळाचे गर्वहरण केल्याची कथा येते. तर अशा वैद्येश्वर विष्णुरूप धन्वंतरींना ही शब्दरूप नमस्कृती सादर समर्पित.
सगळ्याना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा... 🙂