30/01/2021
लहानपणी घरी जेवताना एखादे दिवशी भाज्याच भाज्या असायच्या. एक सगळ्यांसाठी, ती एखाद्याला आवडत नाही म्हणून दुसरी भाजी, आधल्या दिवशीची उरलेली भाजी आणि त्याच दिवशी नेमकी शेजाऱ्यांनी चवीसाठी दिलेली भाजी! पानात एव्हढ्या भाज्या बघून बाबा म्हणायचे आज काय शाकंभरीच झाली. तेव्हा मला शाकंभरी ही भरपूर भाज्या करणारी कोणी बाई आहे असे वाटायचे. आईला विचारले तर तिने शाकंभरी ही देवी असून तिच्या पौष महिन्यातल्या नवरात्राला कमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त १०८ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो असे सांगितले. एव्हढेच नव्हे तर देवीची आरासही भाज्यांनी केली जाते. हे ऐकून खूप गंमत वाटली. फुलांची आरास ठीक आहे पण भाज्यांची आरास? आणि ही देवी एका नैवेद्यात १०८ भाज्या खाते??? खरं तर मळमळलंच होत एव्हढ्या भाज्या हे ऐकून. पानात पहिल्यांदा वाढलेले खायचेच हा नियम असल्याने सुरुवातीला वाढलेली भाजी शेवटपर्यंत पुरवून खाणारी मी, एव्हढ्या भाज्या खायची कल्पनाही सहन करू शकत नव्हते. पुढे भाज्यांची आवड निर्माण होत गेली आणि मी सर्वच प्रकारच्या भाज्या खाऊ लागले. पण शाकंभरी मनात कायमची राहून गेली.
कालपासून पौष शुद्ध अष्टमी पासून शाकंभरी नवरात्र सुरु झाले आहे. ते पौर्णिमे पर्यंत चालेल. देवी भागवतात, अनेक वर्षे जन दुष्काळाने पिडीत झालेले असताना शाक पुरवून क्षुधा शांत करणारी देवी म्हणून शाकंभरीचे वर्णन आले आहे. भारतातील सर्व प्रांतात शाकंभरी ही वनस्पतींची देवी, समृद्धीची देवी म्हणून मान्यता आहे. पौष पौर्णिमेला आई अगदी ६० भाज्या नाही पण बाजारात जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या भाज्यांची एकच मिश्र भाजी आवर्जून करायची. या निमित्ताने विचार करत असताना मला जाणवली ती भारताच्या विविध प्रांतामध्ये केल्या जाणाऱ्या मिश्र भाज्यांची आहार संस्कृती.
ऋषी पंचमीला केली जाणारी मिश्र भाजी (अळू, भेंडी, पडवळ, दोडका, लाल माठाचे देठ, सुरण, मक्याची कणसे, इ.), भोगीला केली जाणारी मिश्र भाजी (ओला हरभरा, घेवडा, वांगी, गाजर, बोरे), हुरडा हावळा पार्टी साठी केली जाणारी मिश्र भाजी (मुख्यत: वांगी आणि शेतात उपलब्ध असलेल्या भाज्या), येळ अमावस्येला केली जाणारी मिश्र भज्जी (गाजर, ओला वाटणा, ओली तूर, मेथी, कांदा पात इ.), पोपटी (वाल पापडी, तुरीच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, वांगी, नवलकोल, सुरण इ.), गुजराथी उन्धीयू (सुरती वाल पापडी, कच्ची केळी, कोनफळ, छोटे बटाटे, ओला वाटणा, ओला हरभरा, ओली तूर, मेथी मुठिया इ.), केरळाचा अवियल (काकडी, तोंडली, शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, कच्ची केळी, सुरण, गाजर, इ.), तामिळनाडूचे कुझांबू (वांगी, गाजर, शेवग्याच्या शेंगा, भेंडी, मुळा, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारली, सुरण, अरबी इ.), बंगाली शुक्तो (कच्ची केळी, वांगी, मुळा, शेवग्याच्या शेंगा, बटाटे, रताळी, वाल पापडी), पंजाबी सरसों दा साग (मोहरीचा कोवळा पाला, पालक, चंदन बटवा, मुळ्याचा पाला, मेथीचा पाला इ.)
या साऱ्या पारंपरिक भाज्यामध्ये त्या भागात उगवणाऱ्या प्रादेशिक भाज्यांचा समावेश कलेला आढळतो. भारतात हेमंत आणि शिशिर ऋतू मध्ये पडणारी थंडी आणि यावेळी उपलब्ध असलेला मुबलक भाजी-पाला यामुळे मिश्र प्रकारच्या भाज्या करण्याची संस्कृती भारतभर दिसून येते. याच कालावधीमध्ये भूक चांगली लागत असल्याने तसेच दिवाळी-संक्रांत यासारखे सण येत असल्याने गोड-धोड आणि पचायला जड अशा प्रकारचे खाणे खाल्ले जाते. त्यामुळे पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अशा मिश्र भाज्या खूपच उपयुक्त ठरतात. या सर्व भाज्यांमधून मिळणारा महत्त्वाचा अन्न घटक म्हणजे तंतुमय पदार्थ. हा चयापचय संस्था तंदुरुस्त ठेवायला मदत करतो. अशा प्रकारच्या भाज्या सावकाश पचत असल्याने यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेह तसेच रक्तदाब कमी राहतो. चांगले कोलेस्ट्रोल वाढते. त्याशिवाय यात कर्बोदके, लोह-पोटॅशियम-कॅल्शियम-मँगनीज यासारखी खनिजे तसेच विविध जीवनसत्त्वे एकत्र मिळत असल्याने या भाज्या म्हणजे खरे तर वन पॉट मिल आहेत. एकाच पदार्थात शरीराला आवश्यक ते संपूर्ण पोषण देणाऱ्या!
रेस्टॉरंट संस्कृतीने लोकप्रिय केलेल्या मिक्स्ड व्हेजिटेबल कुर्मा, मिक्स्ड व्हेज मिली-जुली, मिक्स्ड व्हेज जालफ्राजी यासारख्या मिश्र भाज्यांमध्ये फ्लॉवर, ओला वाटणा, गाजर, सिमला मिरची याच भाज्या कांदा-टोमॅटो, आलं-लसूण आणि गरम मसाला यांची हेराफेरी करून वेगवेगळ्या नावांनी खिलवल्या जातात. सध्या एक मिश्र भाजी खूपच लोकप्रिय आहे. ती म्हणजे पावभाजी. यात तर सगळ्यात मोठी फसवणूक होते. फ्लॉवर, ओला वाटणा, गाजर, सिमला मिरची या भाज्या नुसत्या शोभेला ठेवून मुख्यत: उकडलेल्या बटाट्याच्या लगद्याला पावभाजी मसाल्यात घोळवून प्रचंड पैसे आकारले जातात. त्याहून जास्त मैद्याच्या पावाला! खाणारेही भाजी कमी आणि पावच जास्त अशा पद्धतीने खातात. सगळ्यांची ही आवड बघून मी मात्र पौष्टिक पावभाजी तयार करते. ज्या भाज्या सगळे जण विशेषत: मुले खात नाहीत अशा दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडकी, रताळी मी पावभाजीत घालते. किंबहुना कांदा- टोमॅटो सोडले तर इतर कोणत्याही पावभाजीत घातल्या जाणाऱ्या भाज्या मी घालत नाही. सुरेख लाल रंग यावा म्हणून एखादा बीट घालते. पावा सोबतच मी बेसन घालून कणकीचे जाड पराठेही करते. आता घरच्यानाही मी करत असलेली पौष्टिक फसवणूक कळली आहे. पण मोठ्या लोण्याच्या गोळ्यावर लक्ष ठेवून ते मला माफ करतात आणि पाव सोडून पराठ्यांबरोबरच पावभाजी खातात. तेव्हा गरज आहे ते आपणच ठरवून पौष्टिक पावभाजी सोबत पारंपरिक मिश्र भाज्या करण्याची. तुम्ही कोणत्या मिश्र भाज्या करता, जरूर कळवा.
संगीता खरात
सृष्टीज्ञान संस्था, मुंबई